--------------------------------------
महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह जो १९२७ साली झाला होता त्याला सामाजिक चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रापुरता हा सत्याग्रह मर्यादित नव्हता तर उभ्या देशाला स्फूर्ती, प्रेरणा देणारा ठरला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. येत्या २० मार्च रोजी पुन्हा एकदा एक इतिहास जागा होतोय... आजही गलितगात्र माणसाला या संग्रामाच्या आठवणीने बळ येतं...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीसाठी दिलेल्या पहिल्या जनलढ्याचे जाज्वल्य ध्येय ठरविताना मनोमन पक्के केले होते की, अस्पृश्यांच्या मनोभूमिकेत बंडखोरी रुजली की पशुवत जीवन जगणारा अस्पृश्य समाज मुसंडी मारेल, त्याला ताठ कणा मिळेल, तो ताठर होईल आणि साहसी व धैर्यशाली जीवन जगेल. हा युयुत्सु समाज अस्पृश्य होता, अस्पर्श होता एवढेच नव्हे त्याच्या सावलीने एखादा पाणवठा बाटत होता. गुलामांना गुलामीची आठवण करून दिल्यावर गुलाम आपल्या गुलामीविरुद्ध लढतात याच न्यायाने अस्पर्शाना तुम्ही अस्पर्श आहात हे सांगितल्यावर ते अस्पर्शतेविरुद्ध लढण्यास प्रवृत्त होतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणिले होते. यासंदर्भातला तत्कालीन मुंबई राज्य विधिमंडळाने संमत केलेला एक ठराव अंमलबजावणीची वाट पाहत होता. मुंबई विधान परिषदेतील सन्मान्य सदस्य रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मांडलेला ठराव संमत झाला होता. या बोले ठरावात म्हणण्यात आले होते की, ‘सार्वजनिक तळी, धर्मशाळा, मंदिरे, विद्यालये, न्यायालये आदी जी सरकारी खर्च वा अनुदानाने बांधली वा चालविली जातात. त्यात अस्पृश्यांना मुक्तदार असावे.’ हा ठराव संमत झाला तेव्हा डॉ. आंबेडकर हे विधान परिषदेचे सदस्य नव्हते. आमदार बोले हे अन्य आमदारांसारखे निष्क्रिय आमदार नव्हते तर ते कर्ते आमदार होते. केवळ ठराव करून धूळ खात ठेवण्याऐवजी त्यांनी पुन्हा एकदा ५ ऑगस्ट १९२६ रोजी कायद्यात रुपांतरित केले व ज्या स्थानीय स्वराज्य संस्था ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे अनुदान बंद करण्याची तरतूद केली. अनुदान बंद व्यवहार ठप्प आणि म्हणूनच मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या क्षेत्रात अंमलबजावणीचे ठराव पास केले.
पास केलेल्या ठरावाची अंमलबजावणी तेव्हाच होते जेव्हा जनरेटा वाढला जातो. डॉ. आंबेडकर यांची मुंबई विधानसभेवर फेब्रुवारी १९२७ ला नियुक्ती झाली होती. झालेल्या ठरावाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आमदार डॉ. आंबेडकरांचे सुद्धा कर्तव्य होते. त्यांच्याबाबतीत जनरेटा वा जनलढ्याचा प्रश्नच नव्हता आणि म्हणून त्यांनी १९/२० मार्च १९२७ रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील महाड नगरपालिकेच्या हद्दीत या ठरावाची अंमलबाजवणी करायचे ठरविले. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अस्पृश्य सहकारी कार्यरत होते. गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे, प्रधान बंधू आदी मंडळी आघाडीवर होती. त्यांच्याबरोबर संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर.बी. मोरे, शिवराम जाधव, खोलवडीकर, आड्रेकर, गुडेकर, सी.ना. शिवतरकर, पां.न. राजभोज, एन.टी. जाधव आदी शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार पाणी पिण्याचा सत्याग्रह करण्याचे ठरविले व त्यासाठी एका परिषदेची अंमलबजावणी केली.
पाण्याला जीवन म्हटले जाते, परंतु हेच जीवन अस्पृश्यांना नाकारले जात होते. ज्या तलावाचे पाणी परधर्मीय लोक मुक्त हस्ते पीत होते, पशुपक्ष्यांना मज्जाव नव्हता तो पाणवठा मात्र अस्पृश्याच्या स्पर्शाने बाटत होता. या प्रवृत्तीला आव्हान देण्यासाठी महाडच्या परिसरातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहिले. सार्वजनिक पाणवठ्यावरील ही बंदी धर्मसंमत होती, धर्मशास्त्रानुरूप होती आणि म्हणूनच या शास्त्राला आव्हान देण्याचे ठरविण्यात आले. हिंदुस्थानात अनेक सुधारक जन्माला आले, परंतु धर्मदत्त बंद्यांना आव्हान देण्याचे धैर्य एकाही सुधारकाला झाले नाही. देव, देश आणि धर्मासाठी हाती प्राण घेण्याची वल्गना केली जायची, परंतु आपल्याच धर्मातील लोकांना पशुवत जीवन कंठायला लावणार्यांविरुद्ध एकाही सुधारकाने पाऊल उचलले नाही.
बोले ठरावाची अंमलबजावणी करण्याचा ठराव महाड नगरपालिकेनेही केला होता. या ठरावाची अंमलबजावणी करणार्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १९ मार्च रोजी या ठरावावर भाषणे झाली व दुसर्या दिवशी म्हणजे २० रोजी सकाळी रांगेने जाऊन चवदार तलावाचे पाणी पिण्याचे ठरले. या तलावाला चार दारे असल्यामुळे या तलावाला ‘चौदार तळे’ असेही म्हटले जायचे. या चारही दरवाजांतून सत्याग्रही तळाच्या काठावर आले व त्यांनी स्वत:च्या ओंजळीने पाणी प्राशन केले. हजारो वर्षांची लोटीबंदी त्या दिवशी नष्ट करण्यात आली. बाबासाहेब केवळ पाणीच प्याले नाहीत तर त्यांनी धर्मरूढी मोडीत काढली. पाण्याला जात नसते, रंग नसतो, रूप नसते; परंतु त्या दिवसाच्या पाणी प्राशनानंतर एक प्रचंड विरोधी लाट आली. महाडच्या स्पृश्यांनी सत्याग्रहींना बेदम मारले. एवढेच नव्हे तर महाडच्या ग्रामदेवीचे मंदिर भ्रष्ट केले जाईल, अशी अफवा उठविली. महाडचा हा संग्राम हा दलितांच्या चळवळीतला मैलाचा दगड. या एका लढ्यामुळे ठिकठिकाणचे पाणी पेटले.






















