राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात

राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात; १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ
राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात; १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ 
 संविधानाच्या उद्देशिकेची नोंद असलेला शिलालेख उभारणारी पहिलीच महापालिका 
 नागपूर
संविधानाविषयी जनजागृती करतानाच नागपूर महानगरपालिकेतर्फे राज्यातील पहिल्या संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कची उभारणी करण्यात येत आहे. १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ, म्युरलमधून आंबेडकरांचे चरित्रदर्शन हे या पार्कचे वैशिष्ट्य राहाणार आहे. 
नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सामाजिक जाणिवेतून संविधान पार्कची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे, यापूर्वी या परिसरात १८ फूट उंचीचा आकर्षक संविधान शिलालेख उभारण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची नोंद असलेला शिलालेख उभारणारी नागपूर महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका आहे, हे विशेष. हा शिलालेख पाहायला दूरवरून लोक भेट देतात. यासोबतच संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर शिलालेखाच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.
५० लाखांची तरतूद : नागपूर महानगरपालिकेचे विद्यमान स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा व माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी या संविधान पार्कसाठी उपलब्ध करून दिला आहे. या वास्तूचे वास्तुशिल्पकार आर्किटेक्ट उदय गजभिये यांनी या संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कचे आकर्षक डिझाइन तयार केले आहे. या संविधान पार्कच्या हिरवळीवर संविधान व राजमुद्रा असलेला १५ फूट उंच अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे.
म्युरलमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रदर्शन या संविधान पार्कच्या मध्यमागी सुंदर आकर्षक लॉन असून सभोवती भगवान बुद्ध व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र दर्शवणारे ७ म्युरल तसेच २२ प्रतिज्ञा व बाबासाहेबांचे मौलिक विचार तैलचित्राद्वारे दर्शवण्यात येणार आहे. याशिवाय एका बाजूला भव्य मंच उभारण्यात येत असून त्यावर आकर्षक थाई व जपानी वास्तुकलेचा भव्य पॅगोडा उभारण्यात येणार आहे. परिसरात ध्यानसाधनेसाठी सभागृह, ग्रीन जिमही तयार करण्यात येणार आहे. परिसरातील 'वॉटर फाउंटन टँक'मध्ये भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. 
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive